छत्रपती संभाजीनगर: अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्प हा अवर्षण प्रवण क्षेत्रात येतो. यामुळे दहा वर्षातून एक किंवा दोन वेळाच हे धरण भरते. २५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रकल्पावर अवलंबून आहे.अशा परिस्थिती गोदावरी खोऱ्याचा भाग असलेल्या या धरणांत गोदावरीली बंधाऱ्यातून उपसा सिंचन योजना राबवून पाणी आणा, या मागणीसाठी २५गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी जालना रोडवरील सिंचनभवन येथे ठिय्या आंदोलन केले. विशेष बाब म्हणून गल्हाटी धरणासाठी पाणी मंजूर करून उपसा सिंचन योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्याची घोषणा अधीक्षक अभियंत्यांनी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गल्हाटी मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाठी शेतकऱ्यांनी त्याच्या जमिनी दिल्या होत्या. या प्रकल्पाच्या उर्ध्वभाग हा कमी पावसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. परिणामी दहा,बारा वर्षातून एक किंवा दोनवेळाच हा प्रकल्प पूर्णपणे भरतो. यावर्षी अत्यल्प पावसामुळे गल्हाटी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गोदावरी नदीवरील पाथरवाला येथून उपसा सिंचन योजना राबवून गल्हाटी प्रकल्पात पाणी सोडावे, अशी मागणी मागील २० वर्षापासून शेतकरी करीत आहेत. याबाबतचा प्रस्तावही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास विभागाने शासनास दिला होता. मात्र पाणी शिल्लक नसल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. ही बाब समजल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले. गंगापुरसाठी आ.प्रशांत बंब यांच्या उपसा सिंचन योजनेला पाणी देण्यात येते. आम्ही मराठवाड्यातील नाही का, असा सवाल करीत आम्हालाही जायकवाडी प्रकल्पातून पाणी मिळावे,अशी मागणी करीत सिंचनभवन येथे सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले.
मुख्य अभियंता जयंत गवळी, जलसंपदाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून उपसा सिंचन योजनेला विशेष बाब म्हणून मंजूरी देण्याची मागणी करणारा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची तयारी दर्शविली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सुरेश काळे, जन्मेजय उढाण,अशोक जाधव, पांडुरंग गटकळ, राधाकृष्ण मैंद,राजू सोळुंकेे, आबासाहेब शिंदे, बाळासाहेब मुंडे, बाळासाहेब गव्हाणे, दशरथ साठे आदींनी सहभाग नोदविला.