छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत कृषी मालावर अन्न प्रक्रिया उद्योग उभारून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे समोर आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५९० कंपन्यांनी लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू केले आहेत. संस्थांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध बॅंकांनी तब्बल १६ कोटी ३४ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत जोडधंदा करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणलेली आहे. या योजनेंतर्गत डाळींब, ऊस, टोमॅटो, भाजीपाला आणि दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि फळ प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत करता येतो. यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, नवउद्योजक या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येत आहे.
१३५ जणांना नकार, ४१४ प्रस्ताव अजूनही पडूनप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार १३९ जणांनी राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खाजगी बँकांकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी ५९० उद्योगांना विविध बँकांनी तब्बल १६ कोटी ३४ लाख रुपये कर्ज देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १३५ अर्जदारांना वेगवेगळ्या कारणामुळे बँकांनी कर्ज नाकारले आहेत. उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकरी आणि सहकारी संस्थाचे ४१४ प्रस्ताव विविध बँकांकडे अनेक महिन्यापासून पडून आहेत.
बँकांचा शेतकऱ्यांना आधारप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण मधील विविध शाखांनी ३२३ उद्योगांना आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध ठिकाणच्या शाखांनी २१९ उद्योगांना कर्ज वाटप केले. या योजनेंतर्गत शहरी बँकांकडून कर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे कृषी विभागाचे उपसंचालक डी. डी. तायडे यांनी सांगितले.