छत्रपती संभाजीनगर : कोकणात भातशेतीसाठी वापरलेले जाणारे विनामशागतीचे तंत्रज्ञान सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरीही स्वीकारू लागले आहेत. जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांनी गतवर्षी तब्बल अडीच हजार एकर शेती विनामशागतीची केली.
पारंपरिक पिकांच्या तुलनेत या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय नांगरणे, वखरणे, कोळपणे आणि निंदणे इ.वर होणारा खर्चही कमी झाल्याने हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा दावा कृषी अधिकारी करतात. कोणत्याही पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचा पोत चांगला असावा लागतो. पोत उत्तम राहण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब, गांडूळ, जीवाणूंची चांगली वाढ होणे आवश्यक असते. यासाठी जमिनीतच तण, पिकांची मुळे, खुंट राहू देणे, काडी, कचरा, गवत सडू देणे आवश्यक असते. मात्र आपल्याकडे दरवर्षी शेतीची नांगरणे, वखरणी, रोटाव्हेटर करणे इ. मशागतीची कामे करण्यात येतात.
खरीप हंगामापूर्वी शेतकरी शेतात साफसफाई करतात. यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ होत नाही. यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले. गादी वाफा पद्धतीने शेती करावी. गादी वाफ्यात पिकाची लागवड, पेरणी करावी. दरवर्षी पीक बुडापासून कापून घ्यावे, पण पिकाची मुळे, खुंट, खोड जमिनीतच राहू द्यावी, असे हे तंत्रज्ञान सांगते. २०१९ रोजी कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील मोजक्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विनामशागतीची शेती सुरू केली. त्यांना या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढले आणि खर्चही कमी झाला. कन्नडसह फुलंब्री, सिल्लोड, साेयगाव, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील एकूण बाराशे शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारले. ही माहिती एसआरटी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शक तथा निवृत्त कृषी अधिकारी सुरेशसिंग बेडवाल यांनी दिली.
मजुरावरील खर्चही कमीआमची दहा एकर शेती चार वर्षांपासून विनामशागतीची आहे. पारंपरिक शेतीसाठी नांगरणे, वखरणे, लागवडीनंतर कोळपणी आणि निंदण यावर होणारा खर्च या तंत्रज्ञानात वाचतो. तणनाशकाचा वापर करतो. यामुळे मजुरावरील खर्चही कमी झाला. जमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहत असल्याने उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे.- प्रभाकर सुसलोदे, शेतकरी, रुईखेडा, ता. कन्नड