संदीप शिंदे
हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील गणेश साळुंके या शेतकऱ्याने जिरेनियम वनस्पतीची लागवड करून सुगंधी शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. यासाठी त्यांनी परिसरातील दहा शेतकऱ्यांना एकत्र केले असून, या सर्वांनी दहा एकरवर जिरेनियम लागवड केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत तालुक्यात जिरेनियम लागवडीचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे त्यांची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत.
हतनूर परिसरात अद्रक पिकाची मोठी लागवड होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अद्रकला योग्य भाव मिळत नाही. आणि कापूस, मका पिकातदेखील उत्पन्न व भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यासाठी शेतकरी आता नवनवीन पर्याय निवडत आहेत. गणेश साळुंके यांच्यासह दहा शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय निवडत जिरेनियम शेतीची एका महिन्यापूर्वी लागवड केली आहे.
गणेश साळुंके यांनी जिरेनियम शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी बारामती ॲग्रो कृषी प्रदर्शनास भेट दिली होती. त्यानंतर केंद्र शासनाच्या आरोमा मिशनअंतर्गत लखनऊ सिम्याप येथे प्रशिक्षण घेऊन जिरेनियम शेतीचा प्लांट पाहिला. यानंतर जिरेनियमची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आणखी ९ शेतकऱ्यांना यासाठी प्रवृत्त केले. साळुंके यांना त्यांच्या शेतात लागवडीसाठी ड्रीप आणि खते असा एकरी १ लाख रुपये खर्च आला. या पिकावर फवारणी करण्याचा खर्च येत नाही. प्राणीदेखील या वनस्पतीचे नुकसान करत नसल्याने पिकाला धोका नसतो.
चौकट
उत्पन्न कसे मिळवणार?
एका एकरात लागवड केलेल्या जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून १५ किलो तेल मिळते. हे तेल बाजारात १२ ते १४ हजार रुपये किलो भावाने विक्री होते. हतनूर येथे साळुंके यांच्यासह दहा शेतकरी ही लागवड करीत असल्याने ते तेेल काढण्यासाठी सगळे मिळून डिस्टिलेशन प्लांट उभा करीत आहेत. त्यासाठी त्यांना सुरुवातीला अडीच लाख रुपये खर्च आला. त्यानंतर त्यांनी एक लाखाचा टँक खरेदी केला आहे. एकूण लागवड आणि ऑइल युनिटचा खर्च साडेचार लाख रुपयांपर्यंत येतो.
चौकट
जिरेनियम तेलाचा उपयोग
जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटाने एकत्रित येऊन उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांना फायदा होतो.
कोट
तालुक्यात प्रथमच जिरेनियम शेतीची लागवड होत आहे. कुठल्याही पिकाची लागवड करण्याअगोदर त्याबाबत माहिती मिळवावी. शेतकऱ्यांनी कंपन्यांशी लेखी करार केला पाहिजे. जिरेनियम शेतीचा हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर राबविता येईल.
- बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी, कन्नड
कोट
पारंपरिक शेतीत काहीही हाती राहत नसल्याने आम्ही जिरेनियम शेतीकडे वळलो आहोत. प्रक्रिया केंद्र उभारून जिरेनियम वनस्पतीच्या पानांपासून तेल काढले जाईल. जिरेनियमच्या तेलाला १२ ते १४ हजारांपर्यंत भाव मिळतो. एकरी १५ किलोपर्यंत तेलाचे उत्पादन मिळून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.
- गणेश साळुंके, शेतकरी
फोटो : जिरेनियम शेती
200521\img_20210519_180129.jpg
जिरेनियम चे उगवलेले पीक