पैठण : बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या हिंसक वृत्तीच्या विरोधात शनिवारी (दि.३०) महात्मा गांधी यांच्या हौतात्म्यदिनाचे औचित्य साधून पैठण येथील शेतकरीपुत्रांनी धरणे आंदोलन केले. एक दिवसीय आंदोलनातून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी संघटनेचे माऊली मुळे व पवन शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरीपुत्रांनी दिवसभर धरणे आंदोलन केले. केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जीणे कृषी कायदे मागे घ्यावेत. आधारभूत माल भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू आलेले शांततापूर्ण आंदोलन कुटिलपणे बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली. सरकारच्या या कारस्थानास शेतकरी जबरदस्त प्रतिकार करतील. आंदोलनात गडबड घडवून आणण्यासाठीच आंदोलनात उतरविण्यात आलेल्या किसान मजदूर संघर्ष कमिटीला हाताशी धरून केंद्र सरकारने २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताकदिनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला आहे, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. आंदोलनात माऊली मुळे, पवन शिसोदे, डॉ. भाऊसाहेब झिरपे, गणेश पवार, मोतीलाल घुंघासे, सचिन पांडव, रमेश गव्हाने, शिवाजी साबळे, सुभाष नवथर, बालाजी किल्चे, जयहरी पांगरे, गणेश शिंदे, नयना गवळी यांच्यासह विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
-----------
फोटो : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे देणारे पैठण येथील शेतकरीपुत्र.