गारज : शिवारातील नव्वद टक्के शेतकरी परप्रांतीय मजुरांवर अवलंबून आहेत. अल्पभूधारकांपासून ते बडे शेतकरी शेती कामासाठी मध्यप्रदेशवारी करून अलिशान वाहनांमध्ये मजूर आणण्यासाठी चढाओढ करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
गारज परिसरातील मणुर, बाभूळगाव, शिवगाव पाथ्री, पोखरी, भोकरगाव, बायगाव, झोलेगाव, भटाना, साकेगाव, मनेगाव, जांबरखेडा या गावातील लहान शेतकऱ्यांपासून ते सर्वाधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांकडे शेतकाम करण्यासाठी परप्रांतीय मजूर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामाची मदार परप्रांतीय मजुरावर आहे. मजुरांना राहण्यासाठी शेतशिवारात पत्र्याचे शेड, खाण्यासाठी गहू, तांदूळ, पिण्यासाठी पाण्याची सुविधा पुरविली जात आहे. त्याचबरोबर मजुरांना उचल पैसेदेखील दिले जात आहेत.
-----
स्थानिक मजुरांचा दर जास्त
शेतकरी परप्रांतीय मजुरावर अवलंबून असल्याने जर मजूर अर्ध्यावर निघून गेले, तर शेतकऱ्यांची डोळे असून आंधळे झाल्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे या मजुरांना व त्यांच्या कुटुंबीयांना वर्षभर सांभाळण्याची तयारी या शिवारातील शेतकरी घेतात. असे शेतकरी भीमराज सरोवर, रामेश्वर चव्हाण, रामेश्वर सरोवर, दिगंबर मोरे यांनी सांगितले. आपल्याकडील स्थानिक मजूर चांगले काम करीत नाहीत, तसेच स्थानिक मजुरांचा रोजंदारीचा दरदेखील जास्त असतो. त्यामुळे परप्रांतीय मजुरांना पसंती दिली जात आहे.