कायगाव (जि. औरंगाबाद) : केंद्र सरकारने कांदा निर्यातवर बंदी केल्याच्या निषेधार्थ बुधवारी ( दि.१६ ) जुने कायगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सकाळी ११ वाजता औरंगाबाद - अहमदनगर - पुणे राष्ट्रीय मार्गावर जुने कायगाव टी- पॉइंटवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची घोषणा केल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.
गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादनातून शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळत असताना अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. लगेच सर्वत्र कांद्याचे भाव कोसळले आहेत. रविवारपर्यंत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयापासून ते २ हजार ५०० रुपये पर्यंत भाव मिळत होता. देश पातळीवर ७५ टक्के कांद्याचे उत्पादन राज्यात घेतले जाते. निर्यात होणारा बहुतांश कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचा संताप यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब शेळके यांनी, निर्यातबंदीपूर्वी मिळणारा दर आणि निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मिळणाऱ्या दरात जो फरक येईल ती फरकाची रक्कम मोबदला म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणी केली.
गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके, शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर, मनसेचे बाबासाहेब चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत रोडगे, प्रहारचे गजानन धबडगे, जिल्हा सचिव, राहुल लांडे, सुरेश चव्हाण, राहुल चव्हाण, सुबूर शेख, राधकीसन औटे, सुनील बोराटे, विलास पानसरे, गोकुळ नागे, राजू शेख, नाना म्हसरूप, रामदास वाघ, लक्ष्मण जाधव, रमेश चव्हाण, महेश चव्हाण, शिवाजी लांडे, कांतीलाल चव्हाण, कृष्णा चव्हाण, रामकीसन चव्हाण, दादा चव्हाण, चंदू टाके, सिद्धू अमृते, दत्तू लांडे, काकासाहेब टाके, बाबासाहेब सुखधान आदीसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनाने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होऊन दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.