वैजापूर : शेतीपंपाचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणच्या वैजापूर उपविभागांतर्गत येणाऱ्या पंधरा गावांचा शेतपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या गावातील डीपी बंद करण्यात आल्याने, भांबावलेल्या अडलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने महावितरणच्या वैजापूर येथील कार्यालयात वीजबिल भरण्यासाठी धाव घेतली. यामुळे एका दिवसांत तब्बल बारा लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे व सहायक अभियंता विरांग सोनवणे यांनी दिली.
वैजापूर तालुक्यात शेतीपंपाचे २१ हजार ३११ ग्राहक असून, उपविभाग क्रमांक एक अंतर्गत जवळपास साडेसहा कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट्य आहे. वीजबिल थकीत असल्याने, बाबतारा, भग्गाव, बेलगाव, सुराळा, नगिना पिंपळगाव, खंबाळा, गोयगाव, डवाळा, किरतपूर, लाखगंगा, डोणगाव, भऊर, हिंगोणी, कांगोणी, नारायणपूर या गावातील डीपीचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. या गावात ३ हजार ३०० शेतीपंपधारक आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर, शेतकऱ्यांनी तातडीने महावितरणच्या कार्यालयात धाव घेत वीजबिल भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयात मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
चौकट
सवलतींचा फायदा घ्यावा
महावितरणने वीजबिल माफी २०२० अंतर्गत २०१५ पूर्वीची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार २०१५ पूर्वी थकीत असलेल्या शेतीपंप ग्राहकांना व्याज व दंड शंभर टक्के माफ करण्यात येणार असून, मूळ बिलाच्या केवळ ५० टक्के थकबाकी भरावी लागणार आहे, तसेच २०१५ नंतर थकीत असलेल्या ग्राहकांनाही काही प्रमाणात सूट मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी वीजबिलातून मुक्तता मिळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.