खुलताबाद : पुढील खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाचे फरदड पीक घेऊ नये, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक खेडकर यांनी केले आहे.
खरीप हंगामात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. पाऊस चांगला झाल्यामुळे कापूस पिकाची चांगली वाढ झाली. मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल, अशी आशादेखील शेतकऱ्यांना होती. मात्र, पहिल्या दोन वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. उत्पन्नात ४० ते ५० टक्के घट आली. सध्या कापसाच्या सर्व वेचण्या पूर्ण झाल्या असून, काही शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत आहेत. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी शेतकऱ्यांनी ४ ते ५ महिने कापूस जमीनविरहित ठेवणे आवश्यक आहे. सर्व शेतकऱ्यांनी ३१ जानेवारीअखेर शेतातील उभे कापूस पीक नष्ट करावे. थोड्या उत्पन्नाच्या आशेपोटी शेतकरी फरदड कापूस घेत असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नाही. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतच जातो.