दावरवाडी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाही, ते अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी पैठण तालुक्यातील नांदरच्या तलाठी कार्यालयासमोर गुरुवारी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तलाठ्यांना निवेदन देण्यात आले.
ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात संततधार पाऊस आणि त्यांनतर जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पंचनामे करण्यात आली. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासित केले. मात्र, दिवाळी गेली आणि आता नवीन वर्षाला सुरुवातही झाली. तरीदेखील काही शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी पैठण तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेले शेतकरी आक्रमक झाले आहेत. हातात बॅनर घेऊन शासनाचा निषेध नोंदविला. अचानक झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे शेतकरी नांदर तलाठी कार्यालयासमोर गर्दी जमली होती. यावेळी मंडळ अधिकारी जी. सी. माळी, तलाठी आर. पी. सोनवणे यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या वतीने दिलेले लेखीपत्र आंदोलक शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेऊन त्वरित अनुदान मिळाले नाही, तर भविष्यात तहसील कार्यालयात ठिय्या दिला जाईल, असा इशारा दिला.
फोटो : मंडळ अधिकारी जी. सी. माळी, तलाठी आर. पी. सोनवणे यांना निवेदन देताना दावरवाडी शिवारातील शेतकरी.