मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात शासनाच्या वतीने ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाने दिलेल्या अटींमुळे ६ पैकी पाच खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक निकषाच्या फेºयात अडकल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन, मूग, उडीद ही पिके जोमात बहरली. यातून शेतकºयांना चांगले उत्पन्नही मिळाले. परंतु, शेतकºयांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर खाजगी व्यापाºयांनी शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाकडे पाठ फिरवित कवडीमोल दराने खरेदी सुरू केली. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त झाला. त्यानंतर शासनाने परभणी, जिंतूर, मानवत, गंगाखेड, सेलू, पूर्णा या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून तरी शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र शासनाने हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांचा माल विक्रीसाठी कीचकट अटी व नियम टाकण्यात आले. यामध्ये सर्व प्रथम शेतकºयांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे आपल्या शेतमालाची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. परभणी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांसाठी १ हेक्टरमधील केवळ ९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तसेच पूर्णा तालुक्यातील शेतकºयांसाठी ९ क्विंटल ५० किलो, पालम तालुक्यातील शेतकºयांसाठी ७ क्विंटल ५० किलो, गंगाखेड तालुक्यातील शेतकºयांसाठी ८ क्विंटल ७० किलो, सोनपेठ ८ क्विंटल ८ किलो, पाथरी ६ क्विंटल, मानवत १० क्विंटल, सेलू १० क्विंटल आणि जिंतूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे १ हेक्टरामधील ८ क्विंटल ८० किलोच सोयाबीन हमीभाव केंद्रामार्फत खरेदी करण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध होते व ज्या शेतकºयांना एका हेक्टरमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न झाले आहे. अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांची मात्र गोची झाली आहे.जिल्ह्यात हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रांना आता १५ दिवस झाले आहेत. परंतु, शासनाने हा माल खरेदी करताना टाकण्यात आलेल्या अटी व नियमांमुळेच जिल्ह्यातील परभणी केंद्र वगळता जिंतूर, मानवत, गंगाखेड, सेलू, पूर्णा या पाच केंद्राकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी फिरकलाच नाही. त्यामुळे शासनाने टाकण्यात आलेल्या अटी व निकषाचा पुन्हा एकदा विचार करुन सरसगट सोयाबीनची खरेदी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांतून होत आहे. सध्या सातबारा उताºयावर पीक पेरा लावण्यासाठी शेतकरी तलाठ्यांकडे चकरा मारत असल्याचे दिसत आहे.
निकषाच्या फे-यात अडकला शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:30 AM