औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील आडगाव (जेहुर) येथील अनिल केरूजी सोनवणे (४०) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्या केली. त्यांच्यावर नागरी सहकारी व पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज होते.
या बाबत अधिक माहिती अशी कि, कन्नड तालुक्यातील आडगाव शिवारात अनिल सोनवणे यांची १ हेक्टर ७६ आर एवढी शेती आहे. गट नं. ८४ मध्ये असलेली ही शेतजमीन कोरडवाहू आहे. यावर्षी या भागात अत्यल्प पाऊस झाल्याने उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आले. दुसरीकडे अनिल यांच्यावर सोसायटीचे २५ हजार आणि पंजाब नॅशनल बँकेचे १ लाख ८२ हजार रुपये कर्ज आहे. या दरम्यान कर्जमाफीच्या योजनेत त्यांनी अर्ज केला होता. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या आतापर्यंतच्या कोणत्याही यादीत त्यांचे नाव नाही. अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकचे बी. के. चव्हाण यांनी दिली.
यामुळे आलेल्या नैराश्यातून सोनवणे यांनी सोमवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर त्यांना तत्काळ बोलठान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घटी येथे दाखल करण्यात आले. आज सकाळी उपचारा दरम्यान येथेच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती कृषी उत्पन्न बाजारसमितीचे उपसभापती गणेश शिंदे यांनी दिली. सोनावणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली व आई असा परिवार आहे.