लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़ जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैदरम्यान १७३़ ३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ मृृगाच्या पहिल्या दोन, तीन पावसाने खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला होता़ परंतु आर्द्रात बरसरणारा पाऊस जमिनीत मुरलाच नाही़ जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली ़ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गतवर्षी समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामात ३० जूनपर्यंत ४ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी वेळेवर आगमन झालेल्या मान्सूनने सुरूवातीला सर्वांनाच आनंदी केले़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली़ अधूनमधून तो काही भागात बरसत असला तरी पर्जन्यमानात वाढ झाली नाही़ एमजीएमच्या खगोल व अंतराळ विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, येत्या चार-पाच दिवसांची पावसाची शक्यता आहे़ मध्य भारतात वाऱ्याची व ढगांची गती मंदावल्यामुळे मध्य महाराष्ट्रात मोठ्या पावसाने दीड मारली आहे़ येत्या चार, पाच दिवसांत मध्य भारतामध्ये पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांची स्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल, अशी शक्यताही औंधकर यांनी व्यक्त केली़ १ जून ते ७ जुलैपर्यंत एकूण पाऊस मि़ मी़ मध्ये पुढीलप्रमाणे, नांदेड -२५८़५३, मुदखेड - २२६़ ६६, अर्धापूर -१६९़३३, भोकर -१८९़५०, उमरी -१३४़६६, कंधार -१८०, लोहा-१६२़३३, किनवट-२२६़ ८६, माहूर -१७७़३८, हदगाव -१९८़१८, देगलूर-११६़९९, बिलोली-१६१़६०, धर्माबाद -१६५़३४, नायगाव -१३७़६६, मुखेड-१५३़७२़
पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल
By admin | Published: July 09, 2017 12:28 AM