कन्नड : गेल्या वर्षभरापासून संकटांशी धैर्याने सामना देणाऱ्या शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला आहे. अतिपावसाने नुकसान झालेले असतानाही अनेक भागांत पैसेवारी जास्तीची दाखविल्यामुळे पीकविमा मिळेल की नाही, अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
यावर्षी वरुणराजाचे आगमन वेळेवर म्हणजे मृगनक्षत्रात झाल्याने शेतकरी खुशीत होते. मृगनक्षत्रात झालेली पेरणी लाभदायक ठरते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी खर्चाचे गणितही मांडून ठेवले. मात्र, वरुणराजाने तालुक्यावर इतकी कृपादृष्टी केली की, वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या दीडपट पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेले मूग, उडीद वाया गेले. सोयाबीन काळे पडले, तर मक्यावर पडलेल्या लष्करी अळीपाठोपाठ कणसांची लांबी कमी झाली. काढणी केलेली मक्याची कणसेही अतिपावसामुळे शेतातील पाण्यात तरंगली. कपाशीच्या कैऱ्या सडल्या. तालुक्यातील २७ हजार ३०० शेतकऱ्यांच्या १६ हजार ९८६ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याच्या पंचनाम्यांवरून या शेतकऱ्यांना शासनाची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे पावसामुळे कपाशीच्या कैऱ्या सडल्या तर उर्वरित कैऱ्यांमध्ये बोंडअळीने गनिमी काव्याने हल्ला केला. चौफेर संकटांमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले. मात्र, नुकसानभरपाईतून वगळले गेले असलो तरी पीकविमा मिळेल या आशेवर शेतकरी होता; पण तालुक्यातील प्रत्येक गावांची सुधारित पैसेवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांचा धीर सुटला आहे. करंजखेडा, चिंचोली आणि नाचनवेल या महसूल मंडळांची सुधारित पैसेवारी ५२ ते ५३ आहे, तर उर्वरित मंडळांची सरासरी ६६ दाखविण्यात आली आहे. यामुळे पीकविमा मिळण्यासाठी पैसेवारी ५० पेक्षा कमी लावण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. अर्थात अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर केली जाते.
चौकट
पैसेवारीसंदर्भात हर्षवर्धन जाधवांची आज बैठक
पैसेवारी ५० पेक्षा कमी लावावी याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी दुपारी १२ वा शिक्षक पतसंस्थेच्या हॉलमध्ये शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान आ. उदयसिंग राजपूत यांनी २४ नोव्हेंबर रोजी मदत व पुनर्वसनमंत्र्यांची भेट घेऊन सुधारित पंचनामे करण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र, शेतकऱ्यांनी रबीची तयारी सुरू केल्याने आता पंचनामे कशाचे करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.