लासूर स्टेशन : आद्रक पिकाचे भाव ढासळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी लाखो रुपये खर्च करून आद्रक पिकाची लागवड केली, मात्र सध्या बाजारात ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने नफा तर कोसो मैल दूर असून जो खर्च लागला तोही खिशातूनच भरावा लागत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
देशात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, किराणा आदी जीवनावश्यक वस्तूंसह शेतीसाठी लागणारे खते, बियाणे, मजुरीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वर्षभर शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल बेभाव विकला जात असल्याने त्यांचे वार्षिक अर्थशास्त्र शून्याच्याही खाली जात असल्याचे दिसत आहे. लासूर स्टेशन परिसरात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आद्रक लागवड केलेली आहे. मात्र, ऐन पीक काढणीच्या वेळेसच आद्रक पिकाचे भाव प्रचंड पडल्याने ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मागील वर्षी आद्रक पिकाला तीन ते चार हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. यंदाही शेतकऱ्यांना किमान दोन हजारापर्यंत अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. त्यातच बदलत्या वातावरणाने आद्रक उत्पन्नही घटल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
आद्रक पिकाचा लागवड खर्च
आद्रक लागवडीसाठी एकरी १० क्विंटल आद्रक बेणे ४५ हजार रुपये, शेणखत तीन ट्रॅक्टर ट्रॉली २१ हजार रुपये, रासायनिक खतांचे चार डोस २५ हजार रुपये, सरी व बेड पाडण्यासाठी एकरी २ हजार रुपये, ३ हजार रुपये लागवड, किटकनाशक फवारणी ७ हजार रुपये, निंदणी ९ हजार रुपये असा एकूण एकरी खर्च १ लाख १२ हजार रुपये आला. यात एकरी अद्रक उत्पन्न ६० ते १०० क्विंटल होत आहे. आजच्या ८०० रुपये भावाप्रमाणे ५६ हजार रुपये उत्पन्न होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना किमान ६० हजार रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.
कोट..
यंदा बदलत्या वातावरणामुळे आद्रक उत्पादनात घट झाली आहे. तसेच बाजारातही मातीमोल भाव मिळत आहे. यामुळे एकरी ५० ते ६० हजार रुपये तोटा येत आहे. शासनाने यासाठी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
-सोमनाथ भिकाजी काळवणे, शेतकरी, गाजगाव.
फोटो : शेतकऱ्याच्या शेतातील आद्रक पीक.
260221\img_20210226_173839_1.jpg
शेतकऱ्याच्या शेतातील आद्रक पिक.