वैजापूर : गंगापूर चौफुलीवर असलेल्या फरसाण दुकानावर ग्राहकाची विसरलेली आठ लाख रुपये किमतीचे सोने व पैशांची पर्स फरसाण मालकाने परत केली. दुकानदाराच्या या इमानदारीची चर्चा परिसरात सर्वत्र होत आहे.
याबाबत माहिती अशी की, लासलगाव (जि. नाशिक) येथील वेळांजे कुटुंबातील गणेश वेळांजे याचा साखरपुडा औरंगाबाद तालुक्यातील टेंभापुरी येथे होता. साखरपुड्याला जाण्यापूर्वी वेळांजे कुटुंब नाष्ट्यासाठी येथील फरसाण दुकानावर थांबले होते. यावेळी या कुटुंबातील सविता वेळांजे या महिलेची पर्स चुकून तेथेच विसरुन राहिली. या पर्समध्ये आठ लाख रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम होती. सदर कुटुंब निघून गेल्यानंतर ही बाब दुकानातील कर्मचारी शिवाजी फुलारे यांच्या लक्षात आली. त्याने ती पर्स दुकानमालक ज्ञानेश्वर टेके यांचेकडे सुपूर्द केली. इकडे कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर पर्स हरवल्याची जाणीव वेळांजे कुटुंबीयांना झाल्यानंतर ते हादरुन गेले. दुकानात पर्स विसरली असल्याने ते दुकानात परत आले. त्यांनी विचारपूस केली असता, दुकानमालकाने पर्स असल्याचे सांगितले. सर्व खातरजमा झाल्यानंतर आ. रमेश बोरनारे यांच्याहस्ते ती पर्स वेळांजे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी प्रशांत पाटील सदाफळ, भाऊलाल सोमसे, महेश बुनगे आदींची उपस्थिती होती. यावेळी कुटुंबीयांनी दुकान मालकाचे आभार मानले. टेके यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्याची इमानदारी पाहून सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो कॅप्शन : वेळाजे यांना विसरलेली पर्स देताना आ. रमेश बोरनारे, दुकानमालक ज्ञानेश्वर टेके व इतर.