औरंगाबाद: नव्या सहा पदरी महामार्गामुळे औरंगाबादहून पुणे आता फक्त अडीच तासात पोहचणे शक्य होणार आहे. यासोबत हा मार्ग औरंगाबादसाठी देशातील मेट्रो शहरांना जोडणारे द्वार ठरेल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
औरंगाबाद आणि पुणे ही शहरे महत्वाची असून दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी नव्या सहा पदरी महामार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. याचा डीपीआर देखील तयार झाला असून लवकरच जमीन अधिग्रहण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. तसेच हा महामार्ग पुण्याच्या बाहेरून रिंग रोड येथून सुरु होऊन अहमदनगर शहराच्या बाहेरून पाथर्डी-पैठण आणि शेंद्रा असा असेल. या मार्गे पुणे औरंगाबाद अंतर अडीच तासांत पूर्ण करणे शक्य होईल, असेही गडकरी म्हणाले.
मेट्रो शहरांसाठी ठरेल महाद्वार यासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पुणे येथून रिंग रोडने सुरतला, पुणे येथून बेन्गालुरे, चेन्नई महामार्गावर जाता येईल. त्यासोबतच शेंद्रा येथून पुढे हा महामार्ग समृद्धी महामार्गालाही जोडला जाणार आहे. यामुळे औरंगाबाद येथून दिल्ली, बंगलोर, चेन्नई, सुरत, नागपूर अशा शहरांना वेगवानरित्या जोडले जाणार आहे.