औरंगाबाद: निर्मनुष्य रस्ता पाहून कार पळविणे तरूणाच्या जीवावर बेतले. रस्त्यावरील बॅरीकेड्स तोडून सुसाट कार रस्त्याशेजारील कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावरील गोपाल टीजवळ मंगळवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास झाला.
अथर्व आशितोष नावंदर (२४,रा. बन्सीलालनगर) असे मृताचे नाव आहे. अथर्व हा नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे कार (एमएच-२० एफजी ७०८८) घेऊन जीमसाठी घराबाहेर पडला. मात्र व्यायामशाळेत न जाता तो परत बन्सीलालनगरकडे परत फिरला. पहाटे रस्त्यावर वर्दळ नसल्याचे पाहुन अथर्वने कारचा वेग वाढविला. गोपाल टीसमोर लावलेले बॅरीकेड्स जवळ जाईपर्यंत त्याच्या लक्षात आले नाहीत. अचानक समोर आलेल्या बॅरीकेड्सला चुकविण्याच्या प्रयत्नात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. ताशी १०० ते १२० वेगातील ही कार रस्त्याशेजारील कठड्याला जाऊन धडकली.
हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. अथर्वचे पोट, छाती, कंबरेत गंभीर दुखापत होऊन शरिरात रक्तस्त्राव झाला. दोन्ही पायाला ठिकठिकाणी फ्रॅक्चर झाले व तो जागीच मरण पावला. माहिती मिळताच गस्ती पोलिसांनी धाव घेतली. मात्र अथर्व कारमध्ये अडकून पडला होता. पोलिसांनी त्याला बाहेर काढून तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.अथर्वचे वडिल बांधकाम व्यावसायिक असून त्यास एक भाऊ आहे. या अपघातामुळे बन्सीलालनगर व त्याच्या घरावर शोककळा कोसळली. नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. कौशल पुष्पकुमार लड्डा यांच्या तक्रारीवरुन उस्मानपुरा ठाण्यात घटनेची नोंद पोलिसांनी केली. पोलीस उपनिरीक्षक कौतिक गोरे तपास करीत आहेत.