- संजय जाधवपैठण: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा म्हणून पैठण तालुक्यातील वडवाळी येथील दिव्यांगाने थेट कळसुबाई शिखरावर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. दिवसभर ऊन अन् रात्री कडाक्याची थंडी याची पर्वा न करता दिव्यांग तरूणाने एकट्याने राज्याच्या सर्वोच्च शिखरावर सुरू केलेले उपोषण लक्षवेधी ठरले आहे.
वाढीव मुदत देऊनही राज्य शासनाने मराठा समाजास आरक्षण न दिल्याने मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे.मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी ठिक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पैठण तालुक्यातील वडवाळी येथील दिव्यांग शिवाजी गाडे (४५) यांनी उपोषण करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ५४०० फूट उंच असलेल्या कळसुबाई शिखराची निवड केली.
गुरुवारी गरजेपुरते साहित्य घेऊन दिव्यांग शिवाजी गाडे यांनी कळसूबाई शिखराची चढाई केली. तर शुक्रवार सकाळपासून शिखरावरील मंदिरासमोर उपोषणास प्रारंभ केला. दरम्यान, उपोषणात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिव्यांग शिवाजी गाडे यांच्याशी संपर्क करीत आहेत. मात्र, शिखरावर असलेली कडाक्याची थंडी, रात्री पसरणारा अंधार व शिखरावर चढाई करणे कठीण असल्याने गाडे यांनी दिव्यांग बांधवांनी उपोसणासाठी येऊ नये.सर्व दिव्यांगांच्यावतीने मी येथे उपोषण करत आहे, तुम्ही आपआपल्या गावात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन गाडे यांनी केले आहे.