छत्रपती संभाजीनगर : गांधेली परिसरातील खालसा ढाब्यावर जेवण केल्यानंतर त्या जेवणाचे ८५० रुपये बिल देण्यासाठी एका शेतकऱ्यावर चार जणांच्या टोळक्याने जिवघेणा हल्ला केल्याची घटना १९ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गंभीर जखमी शेतकऱ्याच्या तक्रारवरून अनोळखी चार जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
गांधेली येथील शेतकरी भगवान प्रतापसिंग चंदनसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या गावातील सरपंच शेख मन्नु शेख चुन्नु यांनी फोन करून सोसायटीची निवडणूकीच्या संदर्भात बैठक ठेवली असून, तुम्ही खालसा ढाबा याठिकाणी या, असे सांगितले. त्यानुसार चंदनसे खालसा ढाब्यावर आले. त्याठिकाणी बैठक झाली. त्यानंतर तेथेच जेवणही केले. जेवण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी ढाब्याच्या समोर येऊन स्वत:च्या कारमध्ये बसत असतानाच चार अनोळखी व्यक्तींनी 'आम्ही जेवण केले, त्याचे दिले दे' असे म्हणत चंदनसे यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मारहाणही सुरू केली. एका आरोपीने फायटर काढुन त्यांच्या उजव्या गालावर, ओठावर व हातावर जोरात वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. तेव्हा चार आरोपींनी पकडून त्यांच्या खिशातील १८०० रुपये काढुन घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.
ढाबा मालकाची शिविगाळ
फिर्यादीस आरोपींनी बळजबरीने ढाब्यात नेले. त्याठिकाणी ८५० रुपये बिल भर म्हणून मारहाण सुरू केली. तेव्हा चंदनसे यांनी हॉटेल मालकास आता पैसे नाहीत, उद्या सकाळी आणून देतो, असे सांगितले. तेव्हा त्या मालकाने आरोपीसोबत पंजाबी भाषेत संवाद साधत चंदनसे विषयी चौकशी केली. त्यानंतर मालकानेही शिविगाळ केली. तसेच डाव्या पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या पैशातुन ८५० रुपये बिल घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.