खुलताबाद (औरंगाबाद ) : घरोघरी जाऊन लहाण मुलांना पोलीओचा डोस देणाऱ्या ग्रामीण रूग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना पिता-पुत्राने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना खुलताबाद येथे आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. मिर्झा फारूख बेग खाजा बेग व मिर्झा फजल बेग मिर्झा फारूख बेग असे पिता-पुत्राचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, खुलताबाद ग्रामीण रूग्णालयाचे कर्मचारी शफीक गफूर पटेल व तिमोथी नाटेकर हे आज मंगळवारी सकाळपासून घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्याचे कार्य करत होते. सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान ते शहरातील नगारखानागेट परिसरातील फारूख बेग खाजा बेग (60) यांच्या घरी गेले. येथे लहानमुलांची माहिती घेत असताना मिर्झा फारूख बेग व त्यांचा मुलगा मिर्झा फजल बेग मिर्झा फारूख बेग (22) यांनी,'आमच्या घरात लहान मुले नाहीत, इथे काही नोंद करू नका.' असे म्हणत वाद घातला. तसेच मी माजी नगरसेवक आहे असे म्हणत शिवागाळ करत दोघांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत कामात अडथळा आणला.
याप्रकरणी कर्मचारी शफीक गफूर पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीसांनी मिर्झा फाऱूख बेग व त्याचा मुलगा मिर्झा फजल बेग विरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सपोनि अतूल येरमे, पोहेकॉ संजय जगताप, श्रीकांत चेळेकर, गणेश लिपने, विजय साबळे, महिला पोलीस आमरावकर करत आहेत.