छत्रपती संभाजीनगर : सासऱ्याची मोपेड घेऊन जावई त्याच्या घरी जात असताना हनुमाननगर चौकात सोमवारी (दि. २९ जुलै) सकाळी १० वाजता अचानक मोपेड (क्रमांक एमएच २० बीआर ८४९४)ने पेट घेतला. जावयाने मोपेडला रस्त्याच्या कडेला लावून उडी घेतली. त्यामुळे जावई बालंबाल बचावला. घटनास्थळी सिडको अग्निशमन विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड व त्यांची टीम गाडीसह पोहोचून मोपेडला विझविले. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अंमलदार केशव कसारे यांनी दिली.
बाळकृष्ण माधवराव चिटणीस (वय ६२, रा. एन-४ ) यांची ही मोपेड होती. त्यांच्या घरी सातारा परिसरात राहणारे जावई शांतीभूषण देशपांडे गेले होते. जावई देशपांडे यांनी घरी येण्यासाठी सासरे चिटणीस यांची मोपेड घेतली. ते सकाळी चिटणीस यांच्या घरून मोपेड घेऊन निघाले. साताऱ्याकडे जात असताना हनुमाननगर चौकात अचानक मोपेडने पेट घेतला. त्यामुळे देशपांडे यांनी मोपेड रस्त्याच्या बाजूला लावून मोपेडवरून उडी मारली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. गाडी पोहोचून मोपेडची आग विझवली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.