वैजापूर ( औरंगाबाद ) : तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत मृतदेह सापडलेल्या दोन बालकांची ओळख पटली असून, ते खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बालकांना पित्यानेच विहिरीत ढकलून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. वीरगाव पोलिसांनी निर्दयी पित्यास अटक केली असल्याची माहिती वीरगाव ठाण्याचे सपोनि. हरिश बोराडे यांनी दिली.
२९ डिसेंबर रोजी दोन बालकांचे मृतदेह वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथील एका विहिरीत आढळून आले होते. अथक परिश्रमानंतर अखेर या दोन्ही बालकांची ओळख पडली असून त्यांची नावे कृष्णा वाळुंजे (३), गणेश वाळुंजे (५) अशी असल्याचे कळते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पित्याचे नाव संतोष वाळुंजे असे आहे. त्यांचे मूळ गाव कन्नड तालुक्यातील आठेगाव असून ते सध्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे वास्तव्यास होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वैजापूर तालुक्यातील बापूसाहेब कल्याण पवार यांच्या सावखेडगंगा येथील शेतगट नंबर दोनमधील विहिरीत शनिवारी (दि.२९) दुपारी दोन बालकांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या अंगातील कपड्यांवर नगरच्या एका शाळेचा उल्लेख होता. त्यामुळे वीरगाव पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. मात्र, ही बालके आमच्या शाळेतील नसल्याचा खुलासा प्राचार्यांनी केला होता. मात्र, या शाळेत मुलांची आई कामास असल्याने मुलांनी तेथील शर्ट घातल्याचे उघड झाले. दरम्यान, पोलीस तपासात वाळुंजे कुटुंब खुलताबाद तालुक्यातील रस्त्यावरील गल्लेबोरगाव येथे राहत होते, अशी माहिती मिळाली, तसेच संशयित संतोष वाळुंजे हा औरंगाबाद येथे काम करीत असल्याचे निदर्शनास आले.