समीर सुतके। लोकमत न्यूज नेटवर्कउमरगा : उपचाराला शरीर साथ देत नसल्याने डॉक्टरांनी मुलीला घरी घेऊन जायला सांगितले. हतबल झालेला पिता अश्रूभरल्या डोळ्यांनी घराकडे परतण्यासाठी आजारी मुलीला घेऊन बसस्थानकावर पोहोचला. तिथे गेल्यानंतर मुलीने वडिलांना पाणी मागितले. धावत-पळत जाऊन वडील पाणी घेऊन आले. दोन थेंब पाणी कसेबसे मुलीने घेतले आणि पित्याच्या मिठीतच जीव सोडला. उमरगा बसस्थानकावरील शुक्रवारी दुपारचे हे हृदय हेलावणारे दृष्य. ही घटना कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी दु:खाने कोसळून गेलेल्या त्या पित्याला आपुलकीचा हात देत सर्वतोपरी मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले.शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास उमरगा बसस्थानक नेहमीप्रमाणे गजबजलेले. उन्हाचा पारा मी म्हणत होता. त्यामुळेच बसस्थानकामध्ये प्रवाशांनी गर्दी केलेली. याच गर्दीत हैदराबाद (जिरा) येथील मोहम्मद मारूफ अली विसावलेले. ते आपल्या २५ वर्षीय लेकीला उपचारासाठी उमरग्याला घेऊन आलेले. हैदराबादमध्ये उपचार करूनही सुधारणा होत नव्हती. अशातच कुणीतरी मो. मारूफ अली यांना टीबीवरती उमरग्याला चांगले उपचार मिळतात असे सांगितले. त्यामुळेच मोठ्या आशेने ते आपल्या लेकीला घेऊन उमरग्यात आलेले. शहरातीलच विजय पाटील यांच्या दवाखान्यात त्यांनी मुलीला दाखविले. मात्र उशीर झालेला होता. आजार जास्तच बळावलेला असल्याने शेवटच्या टप्प्यात उपचाराची फारशी संधी नव्हती. त्यामुळेच डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले. डॉक्टरांचे हे वाक्य पित्याचे काळीज चिरत गेले. मात्र त्याही परिस्थितीत अत्यंत धीराने मो. मारूफ अली हे मुलीला घेऊन परतीच्या प्रवासासाठी उमरगा बसस्थानकात पोहोचले. बसस्थानकात टेकताच त्यांची मुलगी नूर आफरीन हिने पित्याकडे पाणी मागितले. धावत-पळत जावून पाणी आणत ते मुलीला पाजत असतानाच नूर आफरीन डोळे पांढरे करीत जमिनीवर कोसळली आणि तिथेच नूर आफरीनचा मूत्यू झाला. अचानक उद्भवलेल्या या बिकट प्रसंगाने पित्याची अवस्थाही दोलायमान झाली. मात्र बसस्थानकात असलेल्या प्रवाशांनी धाव घेत मो. मारूफ अली यांना सावरले. काहीजणांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीसही अवघ्या काही क्षणात घटनास्थळी आले. माहिती घेतल्यानंतर सदर बाप-लेक उपचारासाठी उमरग्याला आले होते हे समजले आणि मग अनेकांनी मो. मारूफ अली यांना मदतीसाठी पुढाकार घेतला. काही प्रवासी त्यांना धीर देत होते, तर काहींनी शव गावाकडे घेऊन जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू केले. मो. मारूफ अली यांच्याकडे तसे पैसेही जेमतेमच होते. हे समजल्यानंतर बीट अंमलदार व्ही. एस. आडसुळे, पोकॉ चैतन्य बोकुलवार, पोकॉ परमेश्वर मेंगले आदींनी मारूफ अली यांना आर्थिक मदत दिली. तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे जमा करून त्या दुर्दैवी पित्याकडे दिले. नूर आफरीनचे शव हैदराबादकडे नेण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी पुढाकार घेतला. पक्षाच्या वतीने अत्यल्प मोबदल्यात अॅम्बुलन्स सेवा पुरविली जाते. सदर अॅम्बुलन्स पवार यांनी तातडीने मागवून घेतली. विशेष म्हणजे यावेळी बसस्थानक परिसरातील अनेकांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यामुळेच मुलीचे शव घेऊन जाण्यासाठी निघालेले मो. मारूफअली हेही भारावून गेले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतानाच त्यांनी बसस्थानकातील या सर्वांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल हात जोडले. स्थानकातील शुक्रवारच्या या प्रसंगाने माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
पित्याने पाणी पाजताच तिने सोडला जीव
By admin | Published: May 12, 2017 11:43 PM