वसमत ( हिंगोली ) : कवठारोड भागातील वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या बापलेकाच्या अंगावरहाय व्होल्टेज विद्युतवाहिनी तुटून पडल्याने होरपळून जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी८ वाजेच्या सुमारास घडली. कवठारोड येथील वीटभट्ट्याहायव्होल्टेजविद्युतवाहिनी खालीच आहेत. या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासन आणि महावितरण यांच्या दुर्लक्षामुळे हे बळी गेल्याची चर्चा होत आहे.
वसमत शहरालगत कवठारोड भागात मोठ्या संख्येने वीटभट्टी आहेत. येथे नांदेड जिल्ह्यातील बेटसावंगी येथील रामदास किशन सोनटक्के व त्यांचा मुलगा पांडुरंग सोनटक्के कुटुंबीयासह कामाला होते. शनिवारी सकाळी रामदास किसन सोनटक्के (५५) व त्यांचा मुलगा पांडुरंग रामदास सोनटक्के (२६) हे दोघे बापलेक काम करत होते. यावेळी वीज पुरवठा बंद होता मात्र अचानक विजेचा दाब वाढला आणि त्यामूळे झटकाबसून तार तुटली. यावेळी तार रामदास सोनटक्के यांच्या पायात अडकली तर पांडुरंग याच्या हातावर पडली. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का लागल्याने दोघांही गंभीर जखमी झाले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. मजुरांनी हा प्रकार सर्वांना सांगितला. वीज वितरणकंपनीला माहिती मिळाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तो पर्यंत दोघे बाप लेकहोरपळून ठार झाले होतेअत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक ही घटना पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच वसमत पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरिक्षक खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर, आणि शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारीघटनास्थळीदाखल झाले.
कवठारोडवर 11 केव्हीं विजेच्या तारा आहेत. या पूर्वीही येथे तारा तुटून दुर्घटना घडली आहे. तारा जुन्या झाल्या होत्या. त्या बदलण्यासाठी अनेकदा निवेदन दिले आहे. मात्र, महावितरणने लक्ष दिले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे वीटभट्टी मालक शेख मसूद यांनी सांगितले. दरम्यान, आ. राजू पाटील नवघरे यांनी पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपातग्रस्त कुटुंबीयांना तात्काळ योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना ही सूचना देऊन मदत करण्याचे सांगितले आहे.