जायकवाडी (औरंगाबाद ): दुपारी होणाऱ्या मुलाच्या लग्नाची सर्वत्र लगबग सुरू असताना वरपित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बोरगाव(ता. पैठण) येथे बुधवारी सकाळी घडली. ज्याठिकाणी मुलाची वरात काढण्यात येणार होती. तेथे पित्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ बोबडे कुटुंबावर आल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
लक्ष्मण देवराव बोबडे (५५, रा.बोरगाव, ता. पैठण) असे मयत वरपित्याचे नाव आहे. बोरगाव येथे लक्ष्मण देवराव बोबडे यांच्या मुलाचा बुधवारी दुपारी बोकुड जळगाव येथील मुलीशी विवाह पार पडणार होता. त्यामुळे वराचे वडील हे बुधवारी सकाळी ७ वाजता उठले होते. मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर त्यांनी चहा घेतला. याच वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
कुटुंबियांनी त्यांना बिडकीनच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले. इकडे विवाहाच्या तयारीत असलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात नातेवाईकांशी संपर्क साधून प्रकृतीबाबत चौकशी केली असता वरपित्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. क्षणार्धात लग्नमंडपात शोककळा पसरली.
अखेर सकाळी ११.३० वाजता बोकुड जळगाव येथे अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडला. यानंतर वरपित्यावर दुपारी १ वाजेदरम्यान बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्न समारंभात वराची मिरवणूक काढण्याच्या वेळीच पित्याची अंत्ययात्रा काढण्यात आल्यामुळे बोबडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत लक्ष्मण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.