कायगाव ( औरंगाबाद ) : हलाखीच्या परिस्थितीत आयुष्यातील ध्येय निश्चित करून गळनिंब येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाने परिसरातील पहिला न्यायाधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ॲड. नीलेश लक्ष्मणराव दहातोंडे पाटील यांनी यश संपादन करून दिवाणी न्यायाधीशपद मिळविले. त्यांची धुळे जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ३१ जुलैला त्यांनी आपला परिविक्षाधीन पदभार स्वीकारला.
नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पाटील यांची जिल्हा न्यायालय, धुळे येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांनी त्याच दिवशी आपल्या परिविक्षाधीन पदाची सुरुवात केली.
नीलेश पाटील यांचे वडील लक्ष्मणराव दहातोंडे पाटील हे जायकवाडी पाटबंधारे विभागात नोकरीला होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी परभणीत घेतले, तर बी.ए.ची पदवी गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात मिळविली. वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण २००९ मध्ये पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर परिश्रम घेत त्यांनी परीक्षा उत्तीर्ण करून न्यायाधीशपद मिळविले. गावातील सुपुत्र न्यायाधीश बनल्याने ग्रामस्थ आनंदी असून, कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर ग्रामस्थ नीलेश दहातोंडे पाटील यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याचे गळनिंबचे शिक्षक राजेश हिवाळे, बलराम नवथर, अप्पासाहेब पाचपुते, नानासाहेब दहातोंडे, डॉ. भगवान सटाले, कल्याण गायकवाड, राहुल सटाले, तुकाराम सटाले, कानिफनाथ उगले, भागीनाथ गोरे, आदींनी सांगितले.
वडिलांच्या निधनानंतर सांभाळली कुटुंबाची जबाबदारी२०११ मध्ये नीलेश पाटील यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना कुटुंबात परतावे लागले. घरची जबाबदारी घेत त्यांनी गंगापूरच्या न्यायालयात व्यवसाय सुरू केला. पर्यायाने घरची शेतीही करावी लागली; मात्र वडिलांची इच्छा होती, आपल्या मुलाने न्यायाधीश बनावे. त्यासाठी नीलेश यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर कठोर परिश्रम आणि कोणत्याही क्लासेसच्या मदतीशिवाय त्यांनी यश मिळविले.