औरंगाबाद : सर्वसाधारणपणे पितृपक्षामध्ये शुभ किंवा नव्या कामाची सुरुवात केली जात नाही, असे आपल्याकडील वातावरण आहे. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पितृ पंधरवडा म्हणजे तर निवांत राहण्याचेच दिवस. असे असले तरी यंदा निवडणूक आयोगाकडून राज्य विधानसभेच्या निवडणुका ह्या पितृपक्षामध्येच घोषित होणार असल्याने पितृपक्षाचे सावट असले तरी ‘इलेक्शन फिवर’ही पाहायला मिळणार आहे.पितृपक्ष पंधरवडा २४ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. पितृपक्षात राजकीय नेतेमंडळी कोणत्याच नव्या गोष्टीला हात घालत नाहीत. काही राज्यांत पितृपक्षाच्या काळात उमेदवारांनी अर्ज भरण्याचे टाळल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. इतकेच काय मंत्रिमंडळ विस्तार, महत्त्वाचे शासकीय निर्णय किंवा राजकीय दौरे हेदेखील या काळात टाळले जातात. अशा वेळी यंदा पितृपक्षातच राज्य विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होणार हे जवळपास निश्चित आहे. निवडणुकांची घोषणा शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी होईल असे दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची धावपळ आणखी वाढणार आहे. शुक्रवारी तारखा जाहीर झाल्यास आॅक्टोबर महिन्याच्या मध्यास किंवा अखेरीस निवडणूक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्याने प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. मात्र, प्रचारासाठी मिळणारा कालावधी लक्षात घेता प्रत्येक इच्छुक किंवा नाव घोषित झालेला उमेदवार पितृपक्ष असला तरी दिवस वाया घालवणार नाही. यामुळे वैयक्तिक भेटीगाठी किंवा सभा- संमेलने या माध्यमातून प्रचार चालूच राहणार आहे. पितृपक्षाशी संबंध न येणाऱ्या समाजघटकातील उमेदवारांचाही संपर्क आणि प्रचार चालू राहणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २६ आॅगस्टदरम्यान लागू होणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी काही पक्षांनी उमेदवारांची किमान पहिली यादी पितृपक्ष सुरू होण्याच्या आधी जाहीर करण्याची तयारी चालविली होती. मात्र, राज्यात युती आणि आघाडीच्या घोळामध्ये जागा वाटपाचाच तिढा न सुटल्याने अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी पितृपक्ष संपल्यानंतरच विविध पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील असे चित्र आहे.