लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभानिहाय मतदारसंघांसाठी ईव्हीएमची (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्राथमिक स्तरावरील तपासणी बुधवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी दोन मतदान यंत्रे आणि ८ नियंत्रण यंत्रांमध्ये बिघाड आढळला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रि येस विरोध दर्शवत यंत्रे ताब्यात देण्याची मागणी केली.औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ०९ विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट , कंट्रोल युनिट , इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) बंगळुरू येथील २१ अभियंत्यांनी सुरू केली आहे. ५ हजार ७४३ बीयू व ३ हजार ७३९ सीयूंचा कोटा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. व्हीव्हीपॅट यंत्र अद्याप आलेले नाहीत. १२ सप्टेंबरपासून शासकीय कला महाविद्यालय, किलेअर्क येथे यंत्रांची तपासणी सुरू झाली आहे. आज १७० यंत्रांची तपासणी झाली. त्यात १० यंत्रात उमेदवार नावासमोरील बटन आणि बॅटरी आॅपरेट होत नव्हती.देशभरात ईव्हीएम विरोधाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ईव्हीएम तपासणी राजकीय पक्ष आणि नागरिकांसमक्ष आयोजित केली आहे. ईव्हीएमबाबत असलेल्या सगळ्या शंका दूर करून ईव्हीएम किती सुरक्षित आहे हे दाखविण्यासाठी हा प्रयोग चालणार आहे. शासकीय कला महाविद्यालयात सर्व राजकीय पक्ष व जनतेसाठी ईव्हीएमची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ दिवसांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दानवे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी, काँग्रेसचे जगन्नाथ काळे यांच्यासह इतर पक्षांचे पदाधिकारी ईव्हीएम तपासणी प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गेले.अधिकारी आणि अभियंत्यांनी ईव्हीएम किती सुरक्षित आहे. हे ठासून सांगितले; पण सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतदान पत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली. ईव्हीएम कसे हाताळावे, याची माहिती द्यायला सुरुवात करताच दानवे म्हणाले, ही सगळी प्रक्रिया माहिती आहे, ईव्हीएम उत्पादक कंपनी,सॉफ्टवेअर कोणते आहे. बंगळुरूची कंपनी उत्पादक आहे की, ईव्हीएम आयात केले, याची माहिती द्या. तसेच ईव्हीएम २४ तासांसाठी आमच्या ताब्यात द्या, प्रशासन आणि आमचे अभियंते दोघे मिळून तपासणी करतील.
तपासणीत १० ईव्हीएम यंत्रे निघाली ‘फॉल्टी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:05 AM