औरंगाबाद: चार वर्षापूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून पिता पुत्राने कुख्यात गुन्हेगार जम्या उर्फ जमीर खान शब्बीर खान (रा. नवाबपुरा) याचा चाकूने भोसकून खून केल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले. सिटीचौक पोलिसांनी आरोपी पितापुत्राला आज पहाटे अटक केली. शेख नब्बू शेख हबीब (५२) आणि शेख शोएब शेख नब्बू अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री शहागंज रस्त्यावरील चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेसमोरील नवीन इमारीतीच्या गॅलरीत जम्या उर्फ जमीर खान याचा चाकूने भोसकून खून झाला होता. याप्रकरणी रात्री उशीरा सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खून झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवून खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा हा खून आरोपी नब्बू आणि त्याचा पुत्र शोएब यांनी केल्याचे समजले. आरोपी नब्बू आणि जम्या हे नात्याने साडू होते. चार वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर जम्याने अवघ्या काही महिन्यात बायको सोडून दिली होती. यावरुन नब्बू, शोएब आणि मयत जम्या यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती.
याप्रकरणी आरोपी पितापुत्राने जम्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला होता. या गुंह्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून जम्या जेलमध्ये होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेल प्रशासनाने जम्याला पॅरोल मंजूर केली. यामुळे सहा महिन्यापासून तो जेलबाहेर आला आहे. तेव्हापासून तो पितापुत्रांना सारख्या धमक्या देत होता. नब्बू हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. जम्या हा गुन्हेगारीप्रवृत्तीचा असल्याने त्याची या पितापुत्राला भिती वाटत असे. यामुळे शोएब हा सतत सोबत चाकू बाळगायचा. शुक्रवारी रात्री शहागंज येथे जम्याने त्यांच्यासोबत भांडण सुरू केले. यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली तेव्हा पितापुत्राने त्याला चाकूने भोसकून ठार मारल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. सहाय्यक निरीक्षक एस के खटाने तपास करीत आहेत. आरोपींना चार दिवस पोलीस कोठडीआरोपी नब्बू आणि शोएब या पिता पुत्राला आज अटक केल्यावर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. आरोपीची सात दिवस पोलीस कोठडी मागितली. तेव्हा न्यायालयाने दोन्ही आरोपीना चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. चार वर्षापूर्वी झालेल्या मारामारीनंतर जम्यावर पितापुत्राने दाखल केलेल्या हाफ मर्डर (कलम ३०७)च्या गुंह्यात जम्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. यातच तो पॅरोलवर बाहेर आल्यापासून पितापुत्राना धमकावून भांडण करीत होता.