औरंगाबाद : जिल्ह्यात आजघडीला ४ हजार ९७० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत. जवळपास ८२५ रुग्णांना हे इंजेक्शन पुरतील; परंतु रुग्णांची संख्या घटल्याने इंजेक्शनची मागणीही आपोआप कमी झाली आहे. अनेक इंजेक्शनची मुदत ही डिसेंबरपर्यंतचीच आहे.
कोरोनावर रेमडेसिविर हे औषध प्रभावी असल्याचे मानले जात आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तेव्हा या इंजेक्शनला बाजारात मोठी मागणी होती. इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धडपड करावी लागली. एका रुग्णाला ६ इंजेक्शन द्यावे लागतात; परंतु सध्या इंजेक्शनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. घाटी, जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांत सध्या मोठ्या संख्येत या इंजेक्शनचा साठा आहे. औरंगाबादेत सध्या ४ हजार ९७० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत. ते जवळपास ८२५ रुग्णांना पुरतील, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे म्हणाले.
‘सिव्हिल’चे इंजेक्शन देणार घाटीला जिल्हा रुग्णालयात मुबलक इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्याची एक्स्पायरी डेट डिसेंबरची आहे. त्यामुळे ते घाटीला दिले जात आहेत. तेथे रुग्ण असल्याने इंजेक्शन वापरले जातील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.