औरंगाबाद : शहरात गेल्या महिनाभरात ब्रिटनहून २६ नागरिक आले आहेत. त्यापैकी ७ जणांची कोरोना चाचणी केली असता बुधवारी ५ जणांचे तर गुरुवारी दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. आता उर्वरित १९ जणांचीही आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
नव्या कोरोना विषाणूमुळे जगभरात धास्तीचे वातावरण आहे. त्यामुळे ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश आहेत. शहरात २४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या महिनाभरात ब्रिटन येथून विमानाने २६ नागरिक शहरात दाखल झाल्याची यादी नावासह विमानतळ प्राधिकरणाकडून महापालिकेला मिळाली. या नागरिकांच्या मोबाईल नंबरवरुन पत्ता शोधण्याचे काम सुरु आहे. यातील ९ जणांची माहिती मनपाला मिळालेली असून ७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित १९ नागरिकांची माहिती घेतली जात असून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी बोलावण्यात येणार आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
जानेवारीपर्यंत क्वारंटाईन सेंटरच्या इमारती ताब्यातक्वाॅरंटाईन सेंटर पुन्हा परत ताब्यात घेण्यासाठी विविध संस्थांकडून मनपाकडे पत्र प्राप्त होत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत मनपाने तयार केलेले क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेतलेल्या इमारती परत दिल्या जाणार नाही, असे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.