करमाड : तलाठीपदावर झालेली निवड... सरकारी नोकरी मिळाल्याने गगनात न मावणारा आनंद... नोकरीचा पहिला दिवस... सुखी आयुष्याचे स्वप्न रंगवत असतानाच नियतीने केलेल्या क्रूर थट्टेमुळे एका मातेचा पोटचा गोळा हिरावला गेला आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.
तलाठीपदावर रुजू होण्यासाठी भोकरदनला जाणाऱ्या माय-लेकीची कायमची ताटातूट झाली. दुचाकीच्या मागील चाकात पदर अडकून अपघात झाला. यात अद्विका सुधाकर साळुंके या अवघ्या साडेचार महिन्यांच्या बालिकेचा करुण अंत झाला. तर शुभांगी कदम या जखमी झाल्या.
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला भागातील मनेगावच्या शुभांगी प्रल्हाद कदम यांची काही दिवसांपूर्वी तलाठीपदावर निवड झाली. त्यांना भोकरदन तालुक्यात पदस्थापना देण्यात आली. तलाठी म्हणून रुजू होण्यासाठी शुभांगी या पती सुधाकर दिगंबर साळुंके (३०) व अद्विका या साडेचार महिन्यांच्या बालिकेसह सोमवारी दुपारी भोकरदनकडे दुचाकीने (एमएच-२० ईव्ही ९६०४) निघाल्या. करमाड-लाडसावंगीमार्गे भोकरदनकडे जात असताना मुरूमखेडा फाटा परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ त्यांचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शुभांगी यांचा तोल गेला आणि त्या अद्विकासह जमिनीवर कोसळल्या. जोराने जमिनीवर पडल्याने अद्विकाच्या डोक्यावर गंभीर जखम झाली अन काही कळते न कळते तोच त्या अजान बालिकेचा या अपघातात करुण अंत झाला. आई शुभांगी या देखिल जखमी झाल्या. परंतु आपल्या जखमा विसरून या माऊलीने फोडलेला टाहो ऐकूण वाटसरूंनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
शुभांगी आणि अद्विका या माय-लेकीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून अद्विकाला मृत घोषित केले. तर शुभांगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. सरकारी नोकरीने पोटापाण्याचा प्रश्न सुटला पण एका बेसावध क्षणाने पोटचा गोळाच हिरावल्याचे दु:ख या आईवडिलांना झाले आहे.