औरंगाबाद : संपूर्ण राज्यातील शासकीय रक्त केंद्रांमध्ये २०१३ पासून सुरू असलेली रुग्णहिताची ‘ब्लड ऑन कॉल’ (जीवन अमृत सेवा) ही योजना १ एप्रिलपासून बंद केल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याबरोबर राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
शासकीय रक्त केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये ऑक्टोबर २०१३ मध्ये ब्लड ऑन कॉल (जीवन अमृत सेवा) योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आलेली. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे रक्त संकलनात वाढ होण्यास मदत झाली. तसेच इतरही कामकाजात मोठी मदत मिळालेली होती. परंतु ही योजना ३१ मार्च रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक व तंत्रज्ञ यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठाकर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीमुळे संपूर्ण राज्यातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये रक्ताचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक रक्तकेंद्रांत सध्याच दोन ते तीन दिवस पुरेल, एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे, असे सेवासमाप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले.
शासनाचा निर्णयहा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे योजनेतील कर्मचाऱ्यांची सेवाही संपुष्टात आली आहे. रक्तपेढीत नियमित कर्मचारी कार्यरत असतात.- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
२४ तास सेवा दिलीगेल्या ८ वर्षांपासून औरंगाबादेतील विभागीय रक्तपेढीत वैद्यकीय समाजसेवक म्हणून काम केले. २४ तास सेवा दिली, पण आता काढून टाकले. राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर अशीच वेळ आली आहे.- हनुमान रुळे