छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी नायलॉन मांजाविरोधात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले होते. या वर्षी संक्रांत जवळ आल्यानंतर शहर पोलिसांनी भीती बाळगत गुरुवारी ऑनलाइन नायलॉन मांजा विकणाऱ्या १९ कंपन्यांना विक्री न करण्याची तंबी देत कठोर कारवाईची नोटीसही बजावली आहे.
शहर पोलिस डिसेंबर अखेरीस सक्रिय झाले. गुन्हे शाखेने बेगमपुरा, सिटी चौक परिसरात दोन व्यापाऱ्यांसह एकूण ४ विक्रेत्यांवर कारवाई करीत नायलॉन मांजा जप्त केला.
सोशल मीडिया, ऑनलाइन विक्रीपोलिसांच्या कारवाईचा बडगा सुरू झाल्याने शहरात प्रत्यक्ष विक्रीऐवजी सोशल मीडिया, टेलिग्राम ग्रुपद्वारे मांजा विक्री सुरू झाली. शिवाय, अमेझॉन, फ्लिपकार्टसह विविध ऑनलाइन पोर्टल याची विक्री करतात. यावर राज्य पाेलिसांना नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक ठरते. त्यामुळे अशा १९ कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कायद्यान्वये नोटीस बजावल्याचे संदीप गुरमे यांनी सांगितले. शिवाय, शहरातही साध्या वेशात पोलिस मांजाचा शोध घेतील.
अपघात घटना - १ जानेवारी रोजी येवला तालुक्यात नायलॉन मांजामुळे सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी.- २६ डिसेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात १० वर्षांचा मुलगा सायकल खेळताना मांजात अडकून जखमी.- २४ डिसेंबर रोजी दिंडोशी पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी कर्तव्य बजावून घरी परतताना मांजाने गळा कापला जाऊन जखमी.