औरंगाबाद : परतीचा पाऊस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले की, भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. विधानसभा रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा प्रचारसभांतून देत जनतेकडे मतांचा जोगवा मागतिला होता. ठाकरे यांनी परतीचा पाऊस आणि फडणवीस यांच्या त्या शब्दांचा रविवारी राजकीय संगम जुळवीत टोलेबाजी केली.राज्यात सरकार भाजपच्या मदतीने बनविणार की, इतर पक्षांची मदत घेणार, यासारख्या सर्व राजकीय पक्षांना त्यांनी बगल देत फक्त शेतकरी आणि ओला दुष्काळ यावरच बोलणार असल्याचे सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील काही आमदारांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यासह मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाचा ठाकरे यांनी रविवारी आढावा घेतला. तत्पूर्वी, त्यांनी कन्नड तालुक्यातील कानडगाव आणि वैजापूर तालुक्यांतील गारज याठिकाणी बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले की, पाहणी दौरा हेलिकॉप्टरमधून करण्यासारखा नाही. शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील हाता-तोंडाशी आलेला घास गेला. शेतांमध्ये चिखल झालेला आहे. १८ आॅक्टोबरनंतर पावसाचा जोर वाढला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. पीक विम्याचे काम करणाऱ्या कंपन्यांना बोलणार, तसेच बँकांनादेखील आमच्या भाषेत समजावून सांगणार आहे. शासकीय निकष जसे असतील तसे लावा; परंतु तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे. पीक विम्याच्या कंपन्यांनी कागदी घोडे नाचवू नयेत. विभागीय प्रशासनाने याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना बँका ओल्या दुष्काळात नोटिसा बजावत आहे. हा प्रकार जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. बँका जर माणुसकीने वागल्या नाहीत, तर शिवसेना त्यांना सरळ केल्याविना राहणार नाही, असा दम ठाकरे यांनी बँकांना भरला. दरम्यान, सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात बँकांनी शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून निषेध केला.
केंद्राने आता भरभरून द्यावेराज्य सरकार सोबत आहेच; परंतु लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्राने केंद्राला भरभरून आशीर्वाद दिला. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता. त्यावेळी केंद्राकडून राज्याच्या शेतकऱ्यांना साथ मिळावी, अशी मागणी केली होती. आता ओल्या दुष्काळाचे भयंकर संकट आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांची प्रतिहेक्टरी मदत कर्तव्य म्हणून द्यावी. ओल्या दुष्काळामुळे शेतात पूर्ण चिखल झालेला आहे. दरम्यान, केंद्र शासन आरईसीपीबाबत एक करार करण्याच्या तयारीत आहे. त्या करारामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर कर नसणार आहे, तसेच लघुउद्योजक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्या कराराबाबत नंतर बोलेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.