औरंगाबाद : लॉकडाऊननंतर उद्योगांची विस्कटलेली घडी दिवाळीपासून आता पूर्वपदावर आली आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्यापासून दुसऱ्या लॉकडाऊनला आणखी सामोरे जावे लागते की काय, अशी भीती उद्योगांमध्ये पसरली आहे. तथापि, गेल्या आठ दिवसांपासून खबरदारीच्या उपाययोजनांची काटकोरपणे अंमलबजावणी करण्याविषयी औरंगाबादच्या उद्योगांना उद्योग संघटनांनी सतर्क केले आहे.
युरोप आणि दिल्लीतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची आकडेवारी समोर आल्यानंतर उद्योगांमध्ये लॉकडाऊनची चर्चा आणि भीती सुरू झाली. कोरोना महामारीमुळे कधी नव्हे तेवढे उद्योग क्षेत्र बाधित झाले होते. लॉकडाऊनमुळे ऑर्डरचे प्रमाण मंदावले. निर्यात व दळणवळणावर परिणाम झाला. कामगार गावी निघून गेले. उत्पादन क्षमता २५ ते ३० टक्क्यापर्यंत खाली गेली. तब्बल पाच महिने उद्योगांचे अर्थचक्र विस्कळीत झाले. अनलॉकपासून मात्र, उद्योग हळूहळू सावरत गेलेे. दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण क्षमतेने बाजारपेठा उघडल्या आणि उद्योग हळूहळू पूर्वपदावर आले. लघू- मध्यम व सूक्ष्म उद्योगांची आर्थिक परिस्थिती मात्र, अजूनही बिकट आहे. ऑर्डर आहेत; पण या उद्योगांच्या हातावर पैसा नसल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली, तर लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, अशी भीती उद्योगांमध्ये पसरली आहे. त्यामुळे ‘सीआयआय’ व अन्य उद्योग संघटनांनी औरंगाबादच्या उद्योजकांना धीर देत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उद्योगांमध्ये नियमितपणे कामगार- कर्मचाऱ्यांचे तापमान मोजणे, मास्क अनिवार्य करणे, सॅनिटायजर व फिजिकल डिस्टंसिंग, या बाबींचे कटाक्षाने पालन करण्याविषयी सतर्क करण्यात आले आहे. केवळ उद्योगांमध्येच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी, घरी किंवा बाजारपेठांमध्येही सर्वांनी या उपाययोजनांचे स्वयंस्फूर्तपणे पालन केल्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून आपण वाचू शकतो, अशी जागृती करण्यात आली.
चौकट...
सुदैवाने आपण लवकर सावध झालो आहोत
‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आपण सर्वांनीच सजग असले पाहिजे. सुदैवाने यावेळी आपण लवकर सावध झालो आहोत. उद्योग जगताला वाटते की लॉकडाऊन हा शेवटचा उपाय आहे. मात्र, शेवटच्या उपायावर अगोदरच बोलायला पाहिजे, असेही नाही. यासाठी आपण सुरूवातीला जी खबरदारी घ्यायला हवी त्यावरच भर दिला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनियटाझर किंवा हात स्वच्छ धुणे, याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे. घरी, उद्योग आणि कार्यालयामध्ये लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय उपचार कसा मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. मागील आठवड्यापासून या बाबींवर आम्ही उद्योगांमध्ये भर देत आहोत.