विमानतळ रुंदीकरण : पुनर्वसन करा, समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला देण्याची मागणी
औरंगाबाद : सरकारी कर्मचारी जेव्हा विमानतळालगतच्या वसाहतीत मोजणीसाठी सकाळी आले तेव्हा तेथील रहिवाशांच्या डोळ्यात पाणी दाटले होते.
काय सांगू साहेब, घर पडणार, संसार रस्त्यावर येणार या विचाराने जिवाला घोर लागला आहे. आमची झोपच उडाली आहे, भाकरीही घशातून खाली उतरत नाही, असे शोभा मगरे सांगत असताना गौतमनगरातील अन्य महिल्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. पदराने अश्रू पुसून त्या महिला अंत:करणातून बोलत होत्या.
जेव्हापासून विमानतळ रुंदीकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या, त्या दिवसापासून गौतमनगर, मोतीवाला कॉलनीतील रहिवाशांनी धास्ती घेतली आहे. आमच्या प्रतिनिधीने रविवारी चिकलठाण्यातील विमानतळालगतच्या गौतमनगरला भेट दिली. तेव्हा गल्लीत कोण नवखे लोक आले, कोणाच्या घराचे मोजमाप करणार, कोणाचे घर पडणार, या भीतीपोटी लहानांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वजण आमच्या प्रतिनिधींच्या अवतीभोवती जमा झाले होते. ‘साहेब तुम्ही ‘लोकमत’मधून आलात का, मग आमची व्यथा पेपरमध्ये मांडा’ असे म्हणत महिलांनी व्यथा सांगितली. ३० ते ३५ वर्षांपासून आम्ही येथे राहतो. काही घरांची रजिस्ट्री झाली आहे. ते लोक सोडले तर अनेकांनी घर बॉण्डवर घेतले आहे. सरकारी अधिकारी म्हणतात की, तुमचे नाव ७/१२ वर नाही तुम्हाला मोबदला मिळणार नाही. मग आम्ही काय करावे, दुसरे घर घेऊन बांधण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये, आम्हाला राहण्याची पर्यायी व्यवस्था करून द्यावी व समृद्धीप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी येथील महिलांनी केली.
अशीच परिस्थिती अलकापुरी सोसायटी, कामगार कॉलनी, तनवाणीनगरातही पाहायला मिळाली. या परिसरातील काही घरांची मोजणी करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.
चौकट
३० वर्षांपासून राहतो
आम्ही गौतमनगरात ३० वर्षांपासून राहतो. आम्हाला नोटीस आली नाही, पण आमच्याकडून घराची कागदपत्रे घेऊन गेले. पहिले आमची राहण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा, मग रुंदीकरण करा.
शोभा मगर
रहिवासी, गौतमनगर
---
काय होणार याची चिंता
काही जण वगळले, तर अनेकांनी जमिनी बॉण्डवर घेतल्या आहेत. ७/१२ वर नाव नाही, यामुळे तुम्हाला मोबदलाच नाही तर पर्यायी घरही मिळणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत. काय होणार याची चिंता लागली आहे.
चंद्रकला उबाळे
रहिवासी, गौतमनगर
---
मुला-मुलींना घेऊन आम्ही कुठे जावे
आम्हाला मोबदला मिळाला नाही, आमचे पुनर्वसन झाले नाही तर आम्ही आमच्या मुला-मुलींना घेऊन कुठे जायचे, हाच प्रश्न पडला आहे.
सुग्राबी शेख
रहिवासी, मोतीवाला कॉलनी
----
( जोड )