औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतनच्या रूपाने ५० वर्षांपूर्वी जे रोपटे लावले, त्याची फळे आज पाहता आली. आज शाळेची अवस्था वाईट आहे; परंतु कोणापुढे हात पसरायचे नाहीत. शाळेला फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. शाळेतील आपले बांधव, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेटा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. शाळेतून आपल्याला जे मिळाले आहे, ते पुढे अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, यासाठी प्रयत्न करा. समाजासाठी कार्य करा, अशा भावनिक शब्दात शाळेचे पहिले प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले.शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संस्थेतर्फे मंगळवारी शासकीय विद्यानिकेतन शाळेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे संत तुकाराम नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर, माजी खासदार उल्हास पाटील, माजी प्राचार्य दि.रा. गोगटे, जळगाव मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे, शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, प्राचार्या अरुणा भूमकर, अविनाश दबडगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी वि. वि. चिपळूणकर म्हणाले, शाळेला ५० वर्षांपूर्वी जो निधी मिळत होता, तेवढाच आज मिळतो. त्यामुळे शाळा कशी चालवायची, हा प्रश्न आहे; पण आज हा सोहळा पाहतोय की, शाळेचे प्रॉडक्ट असलेल्या विद्यार्थ्यांची मने कणखर झाली आहेत. हे आमचे फलित आहे. खा. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, शासकीय विद्यानिकेतनच्या संकल्पनेचे बीज समोर ठेवून नवोदय विद्यालयाची योजना मांडण्यात आली. देशभरात ती उभी राहिली. ज्या एका बिजापासून नवीन वृक्ष तयार झाले, त्या मूळ बिजाची मात्र निगा राखली नाही. आ. केळकर यांनी मार्गदर्शनात शाळेला वेगळा दर्जा देण्याची मागणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, सचिव मच्छिंद्र चाटे, कोषाध्यक्ष दुष्यंत आठवले, मानसिंग पाटील, डॉ.राजेंद्र बोहरा, गोपीचंद चाटे, यमाजी मालकर आदींची उपस्थिती होती. संचालन राहुल भोसले यांनी केले.
कृतज्ञतेचा भाव जोपासून समाजासाठी कार्य करावे
By admin | Published: September 21, 2016 12:06 AM