औरंगाबाद : लॉकडाऊनच्या संकटात एकवटून कोचिंग क्लासेस संचालक व खाजगी शिक्षकांनी सुरू केलेली कोचिंग क्लासेस असोसिएशनमध्ये (सीसीए) फूट पडली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांच्या विरोधात कार्यकारिणीतील १२ पैकी १० पदाधिकारी एकवटले. कार्यकारिणीला विश्वासात न घेता मांडकीकर यांनी पदवीधर निवडणुकीत आधी प्रहार पक्ष आणि नंतर भाजपाशी परस्पर हातमिळविणी केल्याचा आरोप कार्यकारिणीने केला. त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे यांनी दिली.
यासंबंधी रविवारी पत्रकार परिषद घेऊन सदस्य व पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. प्रा. मांडकीकर यांनी कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वार्थापोटी वेगवेगळ्या पक्षांशी हातमिळवणी केली. हे कृत्य अविश्वासाचे लक्षण असून हे आम्हाला मान्य नसल्याचे उपाध्यक्ष प्रा. पी. एम. वाघ यांनी सांगितले. राज्य कार्यकारिणीने बहुमताने ठराव पारित करून प्रा. मांडकीकर यांना अध्यक्षपदावरून काढले असून त्यांचा असोसिएशनशी कोणताही संबंध राहणार नाही. लवकरच नव्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाईल असेही ते म्हणाले.
कोचिंग क्लासेससंबंधी राज्य शासनाने भूमिका घ्यावी. शहर ग्रामीण दोन्ही ठिकाणी क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. सूक्ष्म व लघु उद्योगाचा दर्जा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यात ११६० क्लासेस असून ७० टक्के क्लासेस संघटने सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला प्रा. मस्के, प्रा. व्ही. जे खोसे, प्रा. ए. डी. मनवर, प्रा. आर. आर. इप्पर, प्रा. ए. बी. पठाडे, प्रा. एस. जी. तांगडे, व्ही. यु. मोरे आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.