छत्रपती संभाजीनगर: महाज्योती, बार्टी, सारथीच्या संशोधकांना फेलोशिपसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रात परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत संशोधक विद्यार्थ्यांनी आज सकाळी येथील देवागिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. प्रश्नपत्रिकेला सील नसून छायाप्रती देण्यात आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप करत परीक्षा प्रक्रिया बंद पाडली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वेळा पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची समोर आले आहे. यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर संशोधक विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज्य शासनाकडून महाज्योती, बार्टी, सारथी या संस्थांद्वारे संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या फेलोशिपसाठी पात्रता परीक्षा आज सकाळी राज्यातील केवळ चार केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी महाविद्यालयात या परीक्षेचे केंद्र होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही प्रश्नपत्रिकांना सील नसल्याचे विद्यार्थ्यांना निदर्शनास आले. यामुळे फेलोशिप पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रिया बंद पाडली. परीक्षा केंद्राबाहेर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली.
परीक्षा नियंत्रक काय म्हणाले...महाज्योती, बार्टी, सारथीच्या पात्रता परीक्षेचे सीलबंद पॅकेटमधील पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आले. पेपर कसे होते याची माहिती नाही. संशोधकांचे काही आक्षेप असल्यास निवेदन देण्यात यावे. याबाबत पुणे विद्यापीठास माहिती देण्यात येईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रकांनी यावेळी दिली.
पेपर रद्द करा, सरसगट फेलोशिप द्यासलग दुसऱ्या वेळा पात्रता परीक्षेत गोंधळ झाला. ही परिक्षाच रद्द करावी, पेट देऊनच सर्वजण संशोधनास पात्र ठरले आहेत. यामुळे सरसगट फेलोशिप देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.