जालना : बदनापूर तालुक्यातील खादगाव शिवारातील सूर्या रिसॉर्टमधून पकडण्यात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्या गुटखा प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक फिरोज तांबोळी याचा जामीन अर्ज बुधवारी जालना येथील न्यायालयाने फेटाळला. २० दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील खादगाव शिवारातील सूर्या रिसॉर्टवर औरंगाबाद येथील अन्न आणि औषधी विभागाच्या पथकाने छापा मारून तब्बल दीड कोटी रूपयांचा तयार करण्यात येत असलेला गुटखा आणि त्यासाठी लागणाऱ्या मशिन जप्त केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास बदनापूर पोलिसांकडे देण्यात आला होता. परंतु यात शहरातील काही बड्या आसामींचा सहभाग आढळून आल्याने बदनापूर ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रफिक शेख यांनी या प्रकणात म्हणावा तसा तपासाला गती दिली नव्हती. त्यामुळे माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्याने पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी शेख यांना निलंबित करून त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास दिला. यात दीपक दास, फिरोजलाला तांबोळी आणि जगदीश खट्टर यांंना अटक केली आहे. तिघेही न्यायालयीन कोठडी आहेत. सूर्या रिसॉर्ट येथे तयार होत असलेल्या गुटख्यात मोठ्या प्रमाणात विषारी द्रव्य निकोटीन,मॅगनिज तपासणीत आढळून आले आहे. हे नागरिकांच्या जीवाला धोकादायक असल्याचे सरकारी वकील विपूल देशपांडे यांनी न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिले. आणि सदर आरोपीची जामीन देवू नये अशी मागणी लावून धरली होती. न्यायालयाने हे ग्राह्य धरत तांबोळीस जामीन नाकारला. (प्रतिनिधी)
फेरोज तांबोळीला जामीन नाकारला
By admin | Published: August 18, 2016 12:34 AM