जिल्ह्यातील पहिली कारवाई : ३२ परवानेही निलंबित
औरंगाबाद : कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संनियंत्रण कक्षाला अंभई येथे जादा दराने खतविक्रीबाबत तक्रार नोंदवली गेली होती. त्या अनुषंगाने सिल्लोड येथील खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी आर.व्ही. शेख यांनी सापळा रचून अंभई येथील शिवसाई ॲग्रो एजन्सीज येथे तपासणी केली व जादा दराने खतविक्री करताना आढळून आल्याने त्या विक्रेत्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही पहिली कारवाई ठरली.
खतांच्या दरांची खात्री करण्यासाठी डमी ग्राहक पाठविला असता शिवसाई ॲग्रो एजन्सी येथे १०:२६:२६ प्रकारच्या खताची १३७५ रुपये किंमत असताना डमी ग्राहकाला बॅग रुपये १४०० रुपयांना कच्ची पावती देऊन विक्री केल्याचे आढळून आले. खतविक्री करताना आधार क्रमांक, शेतकऱ्याचा अंगठा ई-पॉज मशीनवर न नोंदवता खतविक्री करण्यात आली. त्यामुळे संबंधित कृषिसेवा केंद्रावर खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्यात आली असून, संबंधिताचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.
---
३२ केंद्रांवर खतांच्या साठ्यात तफावत
कृषी विभागामार्फत ई-पॉज मशीनवर नोंदणी व प्रत्यक्षातील साठ्यांची तपासणी अभियान हंगामापूर्वी राबविण्यात आले असून, ३२ विक्रेत्यांकडे एकूण १००२ मे. टन खताची तफावत आढळून आल्याने संबंधित विक्रेत्यांचे परवाने हंगामापूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत, असेही गंजेवार यांनी सांगितले.
--
१३ तक्रारी आल्या
--
राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आले आहेत. त्यात आतापर्यंत राज्यस्तरावर नऊ, तर जिल्हास्तरावर पाच तक्रारी ई-मेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑनलाइन दाखल झाल्या. त्या सर्व तक्रारींचा निपटारा व शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यात आल्याचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी सांगितले.