औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने आलेली खताची शेकडो पोती रविवारी पडलेल्या पावसात भिजली. उघड्यावर पडलेली खताची पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, तोपर्यंत अनेक पोती भिजण्यापासून वाचू शकली नाहीत.
रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर प्रत्येकी ४२ डब्यांच्या दोन मालगाड्यांतून अडीच हजार टन पोटॅश आणि युरिया खताची पोती दाखल झाली होती. मालगाडीतील ही खताची पोती उघड्यावर उतरविण्यात आली होती. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक पावासाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच ही पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यासाठी एकच धावपळ करण्यात आली; परंतु तोपर्यंत अनेक पोती पावसाच्या पाण्यात भिजून गेली. पाऊस थांबल्यानंतरही या ठिकाणी साचलेल्या पाण्यातच पोती पडून असलेले चित्र पाहायला मिळाले.
दुष्काळामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेला आहे. किमान यंदातरी चांगला पाऊस पडेल आणि संकट दूर होईल, अशी आशा शेतकरी लावून बसले आहेत. पेरणीची तयारी केली जात आहे. मात्र, पेरणीपूर्वीच पहिल्याच जोरदार पावसात खत भिजण्याचा प्रकार झाला. मालगाडीतील माल वेळीच उतरविला नाही तर प्रत्येक पोत्यापोटी रेल्वेला शुल्क मोजावे लागते. हे शुल्क वाचविण्यासाठी थेट उघड्यावर माल उरविण्याचा प्रकार होतो आणि त्यातून खताची पोती भिजण्याचा प्रकार होतो.
दरवर्षी होतो प्रकारपावसात खत भिजण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच झालेला नाही. प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हा प्रकार होत आहे. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रशासन आणि मालवाहतूकदार खबरदारीचे पाऊल उचलण्यास तयार नाहीत. मालधक्क्यावर सध्या ११ मालडब्यांच्या क्षमतेचे शेड आहे. हे शेड वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याकडे सतत दुर्लक्ष होत आहे.
रेल्वेचे हात वरखताची पोती भिजण्याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, यासंदर्भात रेल्वेची जबाबदारी नसते. माल मागविणाऱ्याकडून खबरदारी घेतली पाहिजे, असे म्हणत त्यांनी हात वर केले. खताची पोती भिजली तरी काहीही परिणाम होत नसल्याचा दावा मालवाहतूकदारांकडून करण्यात आला.