किनवट : उसाला पाणी देत असताना शेतगड्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना अंबाडी शिवारात १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घडली़ तर पाण्याच्या शोधात आलेल्या तीन वर्षीय रोह्याचा मृत्यू झाल्याची घटनाही अंबाडीतांडा शिवारात माळावर १७ रोजीच सकाळी घडली़अशोक पोचन्ना भुसावार (५०, रा़अंबाडी) सालगडी म्हणून काम करतात़ गावालगतच्या शेतात उसाला पाणी देत असताना रानडुकराने अचानक हल्ला चढवून उजव्या हाताला चिरूनच काढले़ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात जखमी भुसावार यांना उपचारासाठी दाखल केले़ आदिलाबादला हलविण्यात आले़ घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जी़पी़टेकाळे यांनी जखमीची भेट घेवून अस्थेवाईकपणे विचारपूस केली़ दुसऱ्या एका घटनेत १७ फेब्रुवारी रोजी सकाळी किनवट-मांडवी रस्त्यावरील एका शेताजवळील खदानीत अडीच ते तीन वर्षीय रोही मृत अवस्थेत आढळून आला़ पाण्याच्या शोधात हा रोही आला असावा़ धावत धावत येवून पाणी पिल्याने रोहीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला़ घटनास्थळी वनपाल म़युनुस शे़उस्मान, वनरक्षक जी़पी़टेकाळे यांनी भेट दिली़ घटनास्थळ महामंडळाच्या हद्दीत येत असल्याने महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला़ वन्यप्राणी मानव वस्तीकडे येवू नयेत यासाठी जंगल भागात पानवठे निर्माण करण्याची मागणी आहे़ (वार्ताहर)
शेतगड्यावर रानडुकरांचा जीवघेणा हल्ला
By admin | Published: February 18, 2016 11:41 PM