वैजापूर ( औरंगाबाद ) : शेतात पाणी घुसल्याचे कारण विचारल्याचा राग आल्याने एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना तालुक्यातील आलापुरवाडी येथे रविवारी घडली. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आलापूरवाडी येथील रहिवासी भैय्यासाहेब पोपट पगारे यांची १६२४ गट नंबर मध्ये शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतात बाबासाहेब ताराचंद पगारे यांच्या गट नंबर १५८२ मधील शेतातील पाणी आले. हे पाणी कसे आले ? याचे कारण भैय्यासाहेब पगारे यांनी विचारले असता बाबासाहेब पगारे यांच्या कुटुंबीयांनी भैय्यासाहेब यांच्या कुटुंबीयांवर काठी, कुऱ्हाड व गजाने जोरदार हल्ला केला.
या हल्ल्यात भैय्यासाहेब पगारे यांच्या सह अशोक पगारे, आप्पासाहेब पोपट पगारे, देविदास संभालाल पगारे, संदीप अशोक पगारे, सचिन अशोक पगारे, आजीनाथ देविदास पगारे हे सात जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अशोक पोपट पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून बाबासाहेब ताराचंद पगारे, विशाल बाबासाहेब पगारे, सागर बाबासाहेब पगारे, करण बाबासाहेब पगारे, अर्जून बाबासाहेब पगारे या पाच जणांविरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार ए.जी. नागटिळक हे करीत आहेत.