वाळूज महानगर : कोरोगेटेड बॉक्स तयार करणाऱ्या वाळूज उद्योगनगरीतील व्ही.व्ही.इंडस्ट्रिज या कंपनीला मंगळवारी (दि.२२) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आग लागली. यात कंपनीतील महागड्या मशनरींसह कच्चा व पक्का माल भस्मसात झाला असून, कंपनी बंद असल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ( fire at a company manufacturing corrugated boxes in Waluj MIDC)
संजय शिवराम अहिरे (रा.विटखेडा) व संदीप डहाळे (रा.औरंगाबाद) यांची भागीदारीत वाळूज एमआयडीसीत व्ही.व्ही. इंडस्ट्रिज (प्लॉट क्रमांक के.१२९) आहे. या कंपनीत विविध प्रकाराचे कोरोगेटेड बॉक्स तयार करण्यात येतात. मंगळवारी दुपारी १.३० वाजता कंपनीतून अचानक धूर व आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे सुरक्षारक्षक नाथा चव्हाण यांना दिसले. यानंतर त्यांनी संजय अहिरे व संदीप डहाळे यांना कळविले. त्यांनी वाळूज अग्नीशमन विभागाला आगीची माहिती देत कंपनीकडे रवाना झाले. लगतच्या कंपन्यातील कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॉक्स व रॉ-मटेरियलने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान, वाळूज अग्नीशमन विभागाचे अधिकारी के.ए.डोंगरे, बी.जी.काळे, एस.एफ.वासनकर, एस.आर.गायकवाड, डी.एन.राठोड, ए.एम.हातवटे, आर.ए.चौधरे, सी.डी. साळवे, पी.ए.कोल्हे, ए.एस.अंभोरे, व्ही.एस.खेडकर आदींनी दोन अग्निशमन बंब व खाजगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.
आगीत हे साहित्य भस्मसातआगीत कंपनीत कोरोगेटेशन मशिन, टेस्टिंग मशिन,, रोटरी मशनी, स्टिचींग मशिन, पंचींग मशिन, हाय मशिन आदी महागड्या मशनरीसह कंपनीतील कच्चा-पक्का माल, फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे आगीत भस्मसात झाल्याचे कंपनीमालक संजय अहिरे यांनी सांगितले.