हिंगोली : तालुक्यातील विविध भागात अवैध गौण खनिज वाहतुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढल्याने तहसीलीने ७ पथके तयार करुन पंधरा दिवसांत ८० हजारांचा दंड वसूल केला आहे. मागील अनेक दिवसांपासून गौण खनिजाच्या वाहतुकीत वाढ झाली होती. ही वाहतूक थांबविण्यासाठी त्या-त्या भागातील तलाठी जात होते. परंतु एकटा कर्मचारी असल्याने अवैध वाहतूक करणारे वाहनचालक एका व्यक्तीस घाबरत नव्हते, तलाठी किंवा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन सुसाट आणत होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर अवैध वाहतूक वाढतच होती. त्यामुळे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलने ७ पथके तयार केली आहेत. पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार सचिन जैस्वाल आहेत. पथकात पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना कारवाईसाठी दिवस वाटून दिले आहेत. यात गुरुवारी बासंबा, शुक्रवारी खांबाळा, शनिवारी माळहिवरा, रविवारी डिग्रस कऱ्हाळे, मंगळवारी सिरसम, बुधवारी नर्सी नामदेव तर सोमवारी हिंगोली परिसरात कारवाई होईल. तर वाळू घाटावर भेटी देणाऱ्या पथकांचीही नेमणूक केली आहे. यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांस १० हजार ४०० तर माती किंवा मुरुमाची वाहतूक केल्यास ५ हजार २०० असा दंड आकारला जातो. तपासणीत वाहनचालकाजवळ रॉयल्टी पावती नसल्यास दंड आकारला जात आहे. आतापर्यंत या पथकाने १२ कारवाया करुन ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. (प्रतिनिधी)
पंधरा दिवसांत ८० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 12:48 AM