औरंगाबाद : गेली आठ महिने केवळ ऑनलाईन ओळख, चाैथ्या वर्गातून पाचवीत गेल्यावर पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची वर्गात जाण्यापासून ते शेजारच्या बाकावर बसण्यासाठी एकच लगबग दिसून आली. मित्रांच्या भेटीत गुंग पाचवीचे विद्यार्थी, प्रत्यक्ष वर्गात बसल्यावर पहिल्यांदाच हजेरी झाली. फळ्यावर शिक्षकांनी शिकवले, याची मजा काही औरच असल्याचे सांगत ऑनलाईनला कंटाळल्याचे विद्यार्थी म्हणाले.
सोमवारी शहरातील ६९१ शाळांत पाचवीचे वर्ग भरले. प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांना संमतीपत्र घेऊन आत सोडले जात होते. थर्मल गन, ऑक्सिमीटरने तपासणी, हातावर सॅनिटायझरचा फवारा मारुन मास्क न काढण्याची ताकीद शिक्षकांकडून दिली जात होती; तर विद्यार्थ्यांना कधी वर्गात जातो आणि बाकावर बसतो, याची घाई झाली होती. विद्यार्थी आत जाईपर्यंत पालक ओरडून मास्क आणि सॅनिटायझरसह काळजी घेण्याचे सल्ले पाल्यांना देत होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेत आल्याचा आनंद दिसून येत होता. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आतापर्यंत जिल्ह्यात सुरू झाले असून, अद्याप पहिली ते चाैथीचे वर्ग ऑनलाईनच सुरू आहेत.
मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे म्हणाले, शहरातील पाचवीचे सर्व वर्ग सोमवारी सुरू झाले. कोणत्याही शाळेत वर्ग सुरू झाले नाहीत, अशी सायंकाळपर्यंत तरी माहिती आली नाही. सरासरी पन्नास टक्के उपस्थिती होती. पालकांच्या संमतीचे प्रमाण वाढून विद्यार्थी संख्याही हळूहळू वाढेल. शाळा प्रशासनांना शासननिर्देशानुसार कोरोनासंदर्भातील प्रतिबंधक उपाययोजनांची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शहरात पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार १८५ आहे. मात्र, निश्चित उपस्थिती अद्याप कळू शकलेली नाही.