फुलंब्री : तालुक्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांनी २०२० मध्ये खरीप पिकासाठी भरलेले अडीच कोटी रुपये विमा कंपनीने आपल्या घशात घातले असून, केवळ कांदा पिकाला विमा मंजूर करून अन्य महत्त्वाच्या पिकांना विमा नामंजूर केला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. या निर्णयाने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
फुलंब्री तालुक्यात २०२० मध्ये खरीप पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यात जास्तीचा पाऊस पडल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरलेला असताना त्यांना केवळ कांदा पिकाला विमा मंजूर करण्यात आला, तर कपाशी, मका, तूर, सोयाबीन, बाजरी या पिकांचा विमा नामंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण खरिपाचे क्षेत्र ५६ हजार हेक्टर आहे. यातील २१ हजार हेक्टर क्षेत्रातील ५० हजार ५७७ शेतकऱ्यांनी कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, तूर, कांदा या पिकांकरिता एकूण दोन कोटी ५६ लाख ५८ हजार रुपये एचडीएफसी अग्रो या विमा कंपनीला भरलेले आहे. यातील कांदा पिकाला २७४ शेतकऱ्यांना ११ लाख रुपये मंजूर झाले आहे.
चौकट -
तालुक्यात पीकनिहाय झालेले क्षेत्र
कापूस : ९०७ हेक्टर, मका : ७८४ हेक्टर, मुग : ३८५ हेक्टर, तूर : ५ हेक्टर, तसेच २० हेक्टरवर अन्य पिकांचा समावेश आहे. अशी एकूण २ हजार १०२ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. मुळात या आकडेवारीची शासनदरबारी नोंद झालेली आहे. असे असतानासुद्धा विमा कंपनीने याकडे दुर्लक्ष करीत पीक विमा मंजूर केला नाही.
कोट -
अतिवृष्टी झाल्यास महसूल, कृषी व ग्रामविकास या तीन यंत्रणाद्वारे पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन कमी आहे की जास्त याचा अहवाल सादर केला जातो. त्या अहवालावरून विमा कंपनी निर्णय घेते. - काकासाहेब इंगळे, तालुका कृषी अधिकारी.
कोट
मागील वर्षी मी खरीप पिकात कपाशीचा विमा काढला होता. या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असताना याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. विमा कंपनीने यंदा विमा नाकारल्याची माहिती मिळाली. - रवींद्र गायकवाड, गणोरी, शेतकरी.
----
बातमीत जुन्या बातमीचे कट वापरू शकता.